बिस्किटे देऊन प्रवाशांना लुटणाऱ्या त्रिकुटाला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 05:32 AM2018-10-22T05:32:49+5:302018-10-22T05:32:51+5:30
गुंगीचे औषध देत मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटणा-या त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात कुर्ला रेल्वे पोलिसांना यश आले आहे.
मुंबई : गुंगीचे औषध देत मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटणा-या त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात कुर्ला रेल्वे पोलिसांना यश आले आहे. राजेश उर्फ गुड्डू राजाराम पाल, राजू उर्फ पप्पू भगेलू भारतीया, राजकुमार द्वारकाप्रसाद केसरवानी अशी या तीन आरोपींची नावे आहेत. सह प्रवाशांशी ओळख करून त्यांच्याशी मैत्री करणे आणि क्रीमच्या बिस्किटांमध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लुटणे अशी या टोळीची कार्यपद्धती असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी दिली.
भिवंडी, दांडेकरवाडी येथील गायत्रीनगर येथे हे तीनही आरोपी वास्तव्यास होते. या तिघांवर विविध गुन्ह्यांची नोंद असून हे त्रिकूट सराईत गुन्हेगार आहेत. १३ आॅक्टोबर रोजी रोहित भोला शर्मा हा कुर्ला टर्मिनस येथे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास तिकीट काउंटरशेजारी एक्स्प्रेसची वाट पाहत होता. या वेळी आरोपींनी शर्माशी ओळख वाढवून मैत्री केली. त्यांनी रोहितला चहा आणि क्रीमची बिस्किटे खाण्यास दिली. क्रीमच्या बिस्किटांमध्ये गुंगीचे औषध मिसळल्याने काही वेळातच रोहित बेशुद्ध होऊन तेथेच पडला. आरोपींनी रोहितचा मोबाइल फोन आणि त्याच्या जवळील रोख रक्कम असा एकूण २५ हजारांचा मुद्देमाल लंपास करत तेथून पळ काढला. शुद्धीत आल्यानंतर रोहितने कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवत कुर्ला टर्मिनस येथील सीसीटीव्हींच्या माध्यमाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमधून रेल्वे पोलिसांनी आरोपींचे छायाचित्र मिळवले. पोलिसांच्या सूत्रांनी हे तिघे आरोपी भिवंडी येथे राहत असल्याची माहिती दिली. या माहितीनुसार रेल्वे पोलिसांनी भिवंडी येथील राहत्या घरातून तीनही आरोपींना शनिवारी रात्री अटक केल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिली.
>प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन!
दिवाळीनिमित्त विशेष मेल-एक्स्प्रेस फेºया सुरू असून या काळात प्रवासी गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे अनोळखी प्रवाशांकडून अथवा व्यक्तींकडून कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नये. तसेच मेल-एक्स्प्रेसमधील आसनांखालील साखळी बांधून आपल्या बॅग सुरक्षित ठेवाव्या, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.