Join us

स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी ४६ टक्के कमी खर्चाची बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:08 AM

मुंबई : महापालिकेवर ठेकेदार मेहेरबान झाले असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. रस्ते, उद्यान अशा विकासकामांची कंत्राटे कमी खर्चात करण्याची ...

मुंबई : महापालिकेवर ठेकेदार मेहेरबान झाले असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. रस्ते, उद्यान अशा विकासकामांची कंत्राटे कमी खर्चात करण्याची तयारी यापूर्वी ठेकेदारांनी दाखवली. आता चक्क स्मशानभूमी आणि दफनभूमीची स्वच्छता तब्बल ४६ टक्के कमी खर्चाची बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

मुंबईतील ४२ स्मशानभूमी, दफनभूमी स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाईच्या सेवेची वाढीव मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या कामांसाठी ३१ मे रोजी निविदा मागविण्यात आली होती. यामध्ये प्रति चौरस फूट प्रति महिन्यासाठी १.६९ एवढा दर निश्चित करण्यात आला होता. यामध्ये पात्र ठरलेल्या कंपनीने ०.९१ एवढा दर लावला.

स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी ४६ टक्के कमी दरात काम देण्यात येत आहे. पुढील तीन वर्षांसाठी या देखभाल आणि स्वच्छतेच्या कामांवर १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, याआधी उद्यान आणि मैदानांच्या देखभालीमध्ये कमी बोली लावण्यात आल्याने पालिका प्रशासनाने निविदा रद्द केली होती. रस्ते कामात ३० टक्के कमी बोली लावल्याने फेरनिविदा मागवण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्यामुळे आता स्मशानभूमीच्या प्रस्तावावरून वाद होण्याची शक्यता आहे.