यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय जनता पक्षाने ज्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे, त्यापैकी काहींना एकेक करून निरोप देणे सुरू झाले आहे. थेट उमेदवार जाहीर न करता ही पद्धत अवलंबिण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतील, कोणती माहिती द्यावी लागेल, याचा तपशीलही उमेदवारांना सांगण्यात आला आहे. असा निरोप आल्याची वाच्यता कुठेही करू नये, अशी स्पष्ट सूचना उमेदवारांना देण्यात आली आहे. विदर्भामध्ये तीन ते चार आणि मुंबईत दोन ते तीन विद्यमान आमदारांची तिकिटे भाजप कापेल, अशी माहिती आहे. फडणवीस सरकारमध्ये आणि शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळालेल्यांपैकी दोन ते तीन जणांची तिकिटे कापली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोणत्या जागा भाजपला ?
चिखली, मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकोट, मूर्तिजापूर, वाशिम, कारंजा, धामणगाव रेल्वे, तिवसा, अचलपूर, यवतमाळ, आर्णी, वणी, उमरखेड, राळेगाव, पश्चिम नागपूर, दक्षिण-पश्चिम, मध्य नागपूर, उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर, पूर्व नागपूर, काटोल, हिंगणा, सावनेर, उमरेड, कामठी, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, साकोली, तिरोडा, आमगाव, आरमोरी, गोंदिया, गडचिरोली, राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा.
विदर्भात काय शक्यता?
विदर्भात भाजपला ४५ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदेसेना, अजित पवार गट आणि अपक्ष मिळून १६ जागा देण्यात येतील आणि बडनेरामध्ये महायुतीचा पाठिंबा अपक्ष रवी राणा यांना राहील अशी माहिती सूत्रांनी दिली. मराठवाड्यात शिंदेसेनेला दोन जागा जास्त द्या, पण विदर्भात भाजपला किमान ५० जागा मिळाव्यात, असा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांनी केला. पण, शिंदेसेनेने किमान १४ जागा मिळाव्यात, असा आग्रह धरला. मात्र, त्यांना भाजपने १० जागा देऊ केल्या. आणखी दोन ते तीन जागांसाठी शिंदेसेना आग्रही आहे. भाजपला शिंदेसेनेकडील एक जागा हवी आहे.
विदर्भातील जे मतदारसंघ मित्रपक्षांना दिले जाणार असल्याची माहिती आहे, त्यात शिंदेसेना-सिंदखेडराजा, मेहकर, बुलढाणा (जि. बुलढाणा), बाळापूर (जि. अकोला), दर्यापूर, मेळघाट (जि. अमरावती), भंडारा, रामटेक (जि. नागपूर), दिग्रस (जि. यवतमाळ), रिसोड (जि. वाशिम).
अजित पवार गट- अमरावती, मोर्शी, अहेरी, अर्जुनी मोरगाव, तुमसर, पुसद या सहा जागांचा समावेश आहे. सहाही ठिकाणचे विद्यमान आमदार हे अजित पवार गटाचे आहेत. त्यात सुलभा खोडके, देवेंद्र भुयार, इंद्रनील नाईक, धर्मरावबाबा आत्राम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे यांचा समावेश आहे. चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार हे गेल्या वेळी अपक्ष निवडून गेले होते. यावेळी ते कोणाकडून लढणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र, गेल्या वेळी त्यांच्या विरोधात भाजपने निवडणूक लढवली होती. त्यामुळे ही जागा भाजपच्या कोट्यात सध्या आहे.