बंधपत्रित नर्सेसना प्रधान सचिवांनी नाकारली भेट, आंदोलन चिघळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:06 AM2017-12-28T05:06:00+5:302017-12-28T05:07:19+5:30
मुंबई : राज्य कामगार विमा योजनेतील बंधपत्रित (बाँडेड) नर्सेसने कायम सेवेत घेण्याची मागणी करत, मंगळवारपासून आझाद मैदानात पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन गुरुवारपासून चिघळणार आहे.
मुंबई : राज्य कामगार विमा योजनेतील बंधपत्रित (बाँडेड) नर्सेसने कायम सेवेत घेण्याची मागणी करत, मंगळवारपासून आझाद मैदानात पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन गुरुवारपासून चिघळणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी चर्चेसाठी नकार दिल्याने, महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाने सरकारच्या विरोधात ‘सळो की पळो आंदोलना’ची घोषणा केली आहे.
महासंघाचे राज्य महासचिव एस. टी. कांबळे म्हणाले, चर्चेने नर्सेसचा प्रश्न सुटत असतानाही शासनाकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नर्सेसना आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे. मुळात राज्य सरकारने १५ एप्रिल २०१५ रोजी काढलेल्या अधिसूचनेनंतर आरोग्यसेवा आयुक्तालयाने, ४ हजारांहून अधिक बंधपत्रित नर्सेसना विशेष परीक्षा घेऊन कायम केले. मात्र, राज्य कामगार आयुक्तालयाने अशी कोणतीही परीक्षा घेतली नाही. याउलट बंधपत्रित नर्सेसना सरळ सेवेतील परीक्षा देण्यास भाग पाडले. त्यातही सकाळ आणि दुपारच्या सत्रात घेतलेल्या दोन परीक्षांमुळे या भरतीवरच संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने या भरतीची चौकशी करून बंधपत्रित नर्सेसना कायम सेवेत घेण्याची मागणी महासंघ करत आहे.
>चौकशी करा
नर्सेसना कायम करण्याची वेळ येताच शासन जबाबदारी झटकत आहे. मुळात सर्व बंधपत्रित नर्सेस परीक्षेला प्रविष्ट झाल्या असतानाही, एकही नर्स गुणवत्ता यादीत समाविष्ट झालेली नाही. त्यामुळे या सरळ सेवा भरती प्रक्रियेची चौकशी करायला हवी, अशी मागणी आंदोलनकर्त्या नर्सेसनी केली आहे.