Join us

मुंबईत मोठी दुर्घटना, समुद्रात पोहायला गेलेली ५ मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश, ३ बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 1:46 PM

Mumbai News: मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा दुर्घटना घडली असून, येथील मार्वे समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेलेली पाच मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा दुर्घटना घडली असून, येथील मार्वे समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेलेली पाच मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या मुलांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तर तिघे जण अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, मुंबईतील वांद्रे बँडस्टँड येथे पती-पत्नी समुद्रात वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यात पतीला वाचवण्यात आलं होतं, तर पत्नीचा मृत्यू झाला होता.

समुद्रात बुडालेल्या मुलांपैकी वाचवलेल्यांची नावं जितेंद्र हरिजन (१६) आणि अंकुश भरत शिवारे अशी आहेत. तर बेपत्ता असलेल्यांमध्ये शुभम राजकुमार जायसवाल (१२), निखिल साजिद कायमकुर (१३), अजय जितेंद्र हरिजन (१२) यांचा समावेश आहे. ही सर्व मुले मालाड येथील मार्वे बिजवर आंघोळ करण्यासाठी गेली होती. बुडलेल्या मुलांना शोधण्यासाठी अर्धा किमी अंतरापर्यंत शोधमोहिम राबवली जात आहे. सर्वांचं वय १२ ते १८ वर्षांदरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईती वांद्रे येथील एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये हे जोडपे एका दगडावर बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे आणि त्यांची मुलगी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओमध्ये मुलीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. समुद्राच्या लाटा वर येत आहेत आणि पती-पत्नी एकमेकांना धरून बसले आहेत. यानंतर एक जोरदार लाट येते आणि महिलेला घेऊन जाते. मुलगी आणि नवऱ्याच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडतो. व्हिडिओमध्ये 'मम्मी-मम्मी' असा मुलीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. ज्योती सोनार असं महिलेचं नाव आहे.

टॅग्स :मुंबईपाण्यात बुडणेअपघात