मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवलं कोठडीत; ३ IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 11:09 AM2024-09-16T11:09:45+5:302024-09-16T11:12:59+5:30

मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अटकेप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

Big action in harassment case of famous actress kadambari jethwani 3 IPS officers suspended | मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवलं कोठडीत; ३ IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन

मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवलं कोठडीत; ३ IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन

Actress Kadambari Jethwani Case : आंध्र प्रदेश सरकारने एक मोठे पाऊल उचलत रविवारी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले. मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला  चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांवरच कारवाई झाल्याने हे प्रकरण आता चर्चेत आलं आहे. अभिनेत्रीने तिच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात योग्य तपास न करता घाईघाईने अटक करण्यात आणि छळ केल्याचा आरोप केला होता.

मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश सरकारने पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अभिनेत्री कादंबरी जेठवानींच्या तक्रारीनंतर आंध्र प्रदेश सरकारने कारवाई केली. पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य तपास न करता कादंबरी जेठवानीला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप होता.

याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू (डीजी रँक), माजी विजयवाडा पोलिस आयुक्त क्रांती राणा टाटा (महानिरीक्षक दर्जा) आणि माजी पोलिस उपायुक्त विशाल गुन्नी (अधीक्षक दर्जा) यांचा समावेश आहे. तपासाअंती या अधिकाऱ्यांवर अभिनेत्रीचा छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला असून, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुंबईतील रहिवासी असलेल्या कादंबरी जेठवानी यांनी ऑगस्टमध्ये एनटीआरचे पोलीस आयुक्त एस.व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. त्यात त्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, असे म्हटले होते. "विद्यासागर यांच्यासह उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी मला आणि माच्या पालकांचा छळ केला. मला अटक केली आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईहून विजयवाडा येथे आणले. पोलिसांनी माचा अपमान केला आणि बेकायदेशीरपणे मला आणि तिच्या वृद्ध पालकांना ताब्यात घेतले आणि कुटुंबाला ४० दिवसांपेक्षा जास्त काळ न्यायालयीन कोठडीत राहण्यास भाग पाडले," असा आरोप कादंबरी जेठवानी यांनी केला होता.

जेठवानी आणि त्यांच्या कुटुंबाला अडकवण्यासाठी जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप श्रीनिवास यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अनेक दिवस जामीन अर्ज दाखल करू दिला नाही. त्यानंतर आता आंध्र प्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाचा आदेश जारी केला आहे. "अहवालाचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आणि प्रकरणाची परिस्थिती लक्षात घेऊन, सरकार या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की प्रथमदर्शनी पुरावे अस्तित्वात आहेत आणि त्याच्या गंभीर गैरवर्तनासाठी आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाईची हमी देते," सरकारी आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात असेही समोर आले आहे की, पी. सीताराम अंजनेयुलू यांनी अभिनेत्रीच्या अटकेसाठी सूचना दिल्या होत्या. तर आधी एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. ३१ जानेवारी रोजी अटकेचे निर्देश जारी करण्यात आले असताना नंतर २ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला.

कोण आहे आहे कादंबरी जेठवानी?

कादंबरी जेठवानी एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने २०१५ मध्ये फेमिना मिस गुजरात स्पर्धा जिंकली होती. ती फेमिनाची कव्हर गर्ल राहिली आहे. कादंबरी जेठवानी हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिने मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्ये तसेच मॉडेलिंग मोहिमांमध्येही काम केले आहे.
 

Web Title: Big action in harassment case of famous actress kadambari jethwani 3 IPS officers suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.