ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरेंचा निर्धार, पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला खिंडार; २ शिलेदार शिंदेसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 08:29 IST2025-03-10T08:28:36+5:302025-03-10T08:29:12+5:30

Shiv Sena Shinde Group And Shinde Group: २०१९ला ज्यांनी वडिलांच्या विचारांची साथ सोडली, त्यांनी आता कितीही निर्धार केला तरीही पक्षाला लागलेली गळती थांबवता येणार नाही, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.

big blow again uddhav thackeray group two former corporators in mumbai left the party and join shiv sena shinde group | ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरेंचा निर्धार, पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला खिंडार; २ शिलेदार शिंदेसेनेत

ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरेंचा निर्धार, पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला खिंडार; २ शिलेदार शिंदेसेनेत

Shiv Sena Shinde Group And Shinde Group: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. ईशान्य मुंबईत निर्धार शिबिराच्या माध्यमातून शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने राज्यभरातून ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असून, शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर घेत असतानाच दुसरीकडे मुंबईतील ठाकरे गटाचे दोन बडे शिलेदार शिवसेना शिंदे गटात सामील झाले. 

मुंबई महापालिकेत सत्ता राखण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. तसेच येत्या काही दिवसांत विविध ठिकाणी मेळावे, शिबिरे घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे कंबर कसून तयारीला लागल्याचे दिसत असले, तरी ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. 

ईशान्य मुंबईत निर्धार, पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला खिंडार

उद्धव ठाकरे यांचे दोन खंदे शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेले आहेत. दोघेही माजी नगरसेवक आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हे दोन्ही माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने पश्चिम उपनगरातील शिंदे गटाची ताकद वाढल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर , संजय पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही नगरसेवकांसोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, गेली अडीच वर्षे सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेने काम केले असून, यापुढेही सर्वसामान्य माणसाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना कार्यरत राहणार आहे. काही जणांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त मीच दिसत असतो. माझ्यामुळे यांचे दुकान बंद पडायची वेळ आली. त्यामुळे आता निर्धार शिबिरे घेऊन आईची साथ सोडून जाऊ नका, अशी साद घालावी लागत आहे. मात्र ज्यांनी २०१९ ला आपल्या वडिलांच्या विचारांची साथ सोडली, त्यांच्या विचारांना तिलांजली दिली, त्यांनी आता कितीही निर्धार केला तरीही पक्षाला लागलेली गळती थांबवता येणार नाही, अशी टोलेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली.

 

Web Title: big blow again uddhav thackeray group two former corporators in mumbai left the party and join shiv sena shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.