शिवसेनेला धक्का; माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 06:59 PM2021-04-06T18:59:43+5:302021-04-06T19:25:36+5:30
तृप्ती सावंत या निष्ठावंत शिवसैनिक बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत.
मुंबई: माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत तृप्ती सावंत यांनी आज प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
२०१९च्या विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी अपक्ष अर्ज भरत युतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती.
शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला. बेगडी हिंदुत्वाकडून भगव्या हिंदुत्वाकडे... @Dev_Fadnavis@NiteshNRanepic.twitter.com/2USvfsdA3m
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 6, 2021
तृप्ती सावंत यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. तृप्ती सावंत या निष्ठावंत शिवसैनिक बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. बाळा सावंत वांद्र पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
मुंबई: माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपात प्रवेश केला आहे. pic.twitter.com/03hql8S1vJ
— Lokmat (@MiLOKMAT) April 6, 2021
माजी आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्यानंतर वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेने त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात तत्कालीन काँग्रेसचे नेते नारायण राणे निवडणूक लढवित होते. मात्र सहानभुतीच्या जोरावर तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केला.