लालफितीच्या कारभाराचा विद्यार्थ्यांना मोठा फटका
By admin | Published: December 26, 2016 04:37 AM2016-12-26T04:37:13+5:302016-12-26T04:37:13+5:30
मुंबई विद्यापाठीच्या परीक्षा, परीक्षांचे वेळापत्रक आणि निकाल याचे गोंधळ नवीन नाहीत, पण आता महाविद्यालयांच्या लालफितीच्या कारभारामुळे
मुंबई : मुंबई विद्यापाठीच्या परीक्षा, परीक्षांचे वेळापत्रक आणि निकाल याचे गोंधळ नवीन नाहीत, पण आता महाविद्यालयांच्या लालफितीच्या कारभारामुळे पदवी अभ्यासाच्या निकालांना विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या काही महाविद्यालयांना तीनदा परिपत्रक पाठवून, अजूनही त्यांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षांचे गुण विद्यापीठाकडे पाठवलेले नाहीत. त्यामुळे ४ हजार विद्यार्थ्यांचे निकाल रखडू शकतात.
पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या काही विषयांच्या परीक्षा या अंतर्गत घेतल्या जातात. या
अंतर्गत परीक्षांचे गुण विद्यापीठाला कळवणे महाविद्यालयांना बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)
अंतर्गत परीक्षांचे गुण विद्यापीठाकडे पाठविण्यासाठी १४ डिसेंबरपर्यंत महाविद्यालयांना मुदत देण्यात आली होती, तरीही महाविद्यालयांनी या मुदतीचे पालन केलेले नाही. अजूनही प्रथम सत्रातील २ हजार ९९८ आणि द्वितीय सत्रातील १७, तृतीय सत्रातील ९९७ आणि चौथ्या सत्रातील ७९ विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षांचे गुण विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पाठवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सध्या ४ हजार ९१ विद्यार्थ्यांचे निकाल रखडणार आहेत. अंतर्गत परीक्षांचे गुण सादर न करणाऱ्या महाविद्यालयांमध्ये नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे.
महाविद्यालयाच्या लालफितीच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांच्या निकालावर बसू शकतो. ज्या महाविद्यालयांनी अंतर्गत गुण पाठवले नाहीत, त्यांना आॅनलाइनही गुण भरायचे आहेत. त्यासाठी त्यांना
२६ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे आणि एक प्रत त्यांनी विद्यापीठाकडे पाठवावी, असे परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत.