Join us

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 11:09 AM

काही दिवसांपूर्वीच रंगली होती पक्ष सोडण्याबाबतची चर्चा, अजित पवार गटात जाणार?

Baba Siddique Resigns from Congress: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी म्हणाले की, मी तरुण असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आज ४८ वर्षांनी पक्ष सोडत आहे. माझा हा प्रवास खूप छान होता. मी आज माझ्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत आहे. अजून अनेक गोष्टी आहेत ज्या आत्ताच सांगणे योग्य होणार नाही. काही गोष्टी या न सांगितलेल्याच बऱ्या असतात. माझ्या या प्रवासात ज्या-ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत काँग्रेसला माजी मंत्री मिलिंद देवरां यांच्या रुपाने मोठा धक्का बसला होता. त्यातच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. काँग्रेसचे वांद्रे येथील बडे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी गाठीभेटी घेत आहेत. या वाटाघाटी यशस्वी झाल्या आहेत, त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये महत्त्व मिळत नसल्याने तसेच महाविकास आघाडी सरकार असताना निधी वाटपात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या कथित अन्यायाच्या पार्श्वभूमीवर सिद्दिकींची नाराजी वाढत गेली असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गेली ४८ वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या बाब सिद्दीकींनी पक्षाला रामराम ठोकल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :काँग्रेसअजित पवारमुंबई