BJP vs Shiv Sena: उत्तर मुंबईतीलभाजपाचे माजी आमदार अॅड हेमेंद्र महेता यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का देत त्यांनी 'घरवापसी' केली. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. आमदार आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती घोषित झाल्यानंतर आता भाजपात पुन्हा 'इनकमिंग' सुरू झाल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे मालाडचे माजी नगरसेवक बलदेव सिंग माणकू यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर आज मेहताही स्वगृही परतले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गेल्या वर्षीपासूनच शिवसेना कामाला लागली होती. त्यावेळी शिवसेनेकडून भाजपाला एकामागून एक धक्के दिले जात होते. आधी भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाचे बोरिवलीतील आमदार हेमेंद्र मेहता यांनी हातावर शिवबंधन बांधून घेतले होते. मेहता यांनी भाजपाकडून बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले होते. त्यामुळे या भागात मेहता यांचा चांगलाच जनसंपर्क आहे. त्याचा शिवसेनेला फायदा मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचं टेन्शन अधिकच वाढल्याचे चित्र आहे.
उद्धव ठाकरे गटावर भाजपाचं टीकास्त्र
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे असते, तर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना कधीच गेली नसती. पण एका कुटुंबाच्या हातात पक्षाचे सर्व निर्णय गेले की पक्षाची, देशाची वाट लागते हे आपण पाहिले आहे, अशी बोचरी टीका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली. तर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी तर मुंबईत असली कोण आणि नकली कोण हे लवकरच मुंबईकरांना कळेल, अशा शब्दांत मुंबई पालिकेसाठी भाजपा सज्ज असल्याची जणू घोषणाच केली.