'पायल रोहतगीकडून शिवरायांची बदनामी करणारा पडद्यामागील 'बिग बॉस' कोण?'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 06:37 PM2019-06-03T18:37:21+5:302019-06-03T18:37:35+5:30

'शिवाजी महाराज हे मूळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते'

'Big Boss' who behind the scenes of infamy of Shivaji maharaj from Payal Rohatgi? | 'पायल रोहतगीकडून शिवरायांची बदनामी करणारा पडद्यामागील 'बिग बॉस' कोण?'

'पायल रोहतगीकडून शिवरायांची बदनामी करणारा पडद्यामागील 'बिग बॉस' कोण?'

googlenewsNext

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून तिच्यावर टीकेची झोड उडली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी तिचा चांगलाच समाचार घेतला आहे. पायल रोहतगीकडून शिवरायांची बदनामी करवून घेणारा पडद्याआडचा 'बिग बॉस' कोण आहे? असा थेट सवालच शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

"स्वत:ला रामभक्त आणि नमोभक्त म्हणवणारी पायल रोहतगी आता भाजपाची ट्रोल म्हणूनच जणू काम करत आहे. विविध धर्मांमध्ये तसंच समाजांमध्ये विद्वेष पसरवणारे ट्वीट ती करत असते. काही दिवसांपूर्वीच समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचीही तिने बदनामी केली होती, आणि आता तर चक्क महाराष्ट्राचं आराध्यदैवत शिवाजी महाराजांचा तिने अपमान केला आहे. सवंग प्रसिद्धीसाठी पायल कोणत्याही थराला जाऊ शकते. मात्र, तिच्याकडून छत्रपती शिवरायांची बदनामी करवून घेणारा पडद्याआडचा 'बिग बॉस' कोण? हे शोधायला हवे", असे मत शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, पायल रोहतगी हिने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केली आहे. यामध्ये शिवाजी महाराज हे मूळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असे तिने म्हटले आहे. शिवाय, मराठा आरक्षणावरही आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले? असा थेट सवालही तिने केला आहे. 

याचबरोबर, काही दिवसांपूर्वी पायल रोहतगीने नथुराम गोडसेची पाठराखण करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे, या सुपरस्टार कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी ही पोस्ट होती.
‘कमल हासन यांना दहशतवाद आणि खून याच्यातला फरक कळत नाही. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी गोडसे नसून जिना होते,’असे तिने म्हटले होते. यापाठोपाठ राजा राममोहन रॉय हे इंग्रजांचे ‘चमचे’ असल्याचे पायल रोहतगीने म्हटले होते.


ट्विटरवरील इंडियन हिस्टरी पिक्स नावाच्या एका अकाउंटवरून 22 मे रोजी राजा राममोहन रॉय यांचा एक फोटो शेअर झाला होता. त्यात सतिप्रथेचे कट्टर विरोधक आणि समाज सुधारक असे कॅप्शन देण्यात आले होते. पायल रोहतगी हिने हे  ट्विट शेअर करत पायलने राजा राममोहन रॉय यांच्यावर टीका केली होती.


‘नाही, ते इंग्रजांचे चमचे होते. सती प्रथेला बदनाम करण्यासाठी इंग्रजांनी राजा राममोहन रॉय यांचा वापर केला. सती परंपरा देशात कुठेच सक्तीची नव्हती. मोगल शासकांद्वारे हिंदू महिलांना वेश्यावृत्ती ढकलण्यापासून वाचवण्यासाठी या प्रथेचा जन्म झाला. महिला स्वत:च्या मर्जीने सती जात. सती जाणे कुठल्याही प्रकारे चुकीची वा प्रतिगामी प्रथा नव्हती,’असे तिने या  ट्विटमध्ये म्हटले होते.

पायल रोहतगीने मागितली माफी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्टमुळे चांगलाच वाद निर्माण झाला. त्यानंतर पायल रोहतगीने फेसबुक अकाऊंटला एक व्हिडिओ पोस्ट करत याबद्दल माफी मागितली आहे. तिने माफी मागताना म्हटले आहे की, मी हात जोडून सगळ्यांची माफी मागते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मी काही गोष्टी वाचल्या होत्या आणि त्यामुळेच माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले होते. मी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रचंड मानते. त्यांचे पूजन करते. पण मला त्यांच्या संबंधित एक प्रश्न पडला होता. त्याचेच उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. पण यानंतर माझ्या लक्षात आले की, सोशल मीडियावर केवळ त्वेष निर्माण करणारी लोकं आहेत. पण तरीही मी हात जोडून माफी मागते. पण ही माहिती योग्य असती तर सनातन धर्म किती महान आहे हे सगळ्यांना कळले असते. पण माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यापेक्षा माझ्यावर खूप वाईट पद्धतीने टीका करण्यात आली. आपल्याकडे एखादी व्यक्ती सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याला मदत केली जात नाही. मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभ्यास करण्याचा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यातून भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये असेच मला जाणवले.



 

Web Title: 'Big Boss' who behind the scenes of infamy of Shivaji maharaj from Payal Rohatgi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.