मुंबईः मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचीमनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बाळा नांदगावकरांनी हा प्रस्ताव मांडला असून, त्याला इतरांनी अनुमोदन दिलं आहे. त्यानंतर अमित ठाकरेंनी मंचावर येत भाषणातून भावना व्यक्त केल्या. सर्वप्रथम मला राजसाहेबांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. मी ठराव मांडणार असल्याचं त्यांनी मला काळ संध्याकाळी सांगितलं. पायाखालची जमीन सटकणं काय असतं हा अनुभव मला त्यांच्यामुळे मिळाला.त्यांचे खूप खूप आभार. येत्या दोन महिन्यात पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे आपण 14 वर्षं पकनच चालू. 14 वर्षांतलं हे पहिलं अधिवेशन असून, मी पहिल्यांदाच व्यासपीठावर बोलतो आहे. त्यामुळे माझ्या आयुष्याचा हा खूप मोठा दिवस आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आतापर्यंत मला जे प्रेम आणि प्रतिसाद दिलात तो यापुढेही द्याल, अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांच्या आशीर्वादानं शिक्षण ठराव मी तुमच्यासमोर मांडतो आहे. परवडणारी आणि गुणवत्तेच्या शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना होणं आवश्यक आहे. लहान मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी त्वरित अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात जागतिक स्तराचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचं असल्याचं सांगत त्यांनी शिक्षण ठराव मांडला आहे.
2018मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतल्या मनसेच्या सर्वच शाखांना अमित ठाकरेंनी भेट दिली होती. विद्यार्थी संघटनांसाठीही अमित ठाकरेंनी काम केलेलं आहे. मुंबई, नाशिक, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांवर अमित ठाकरेंची नजर राहणार असून, ते काम करणार आहेत. युवांना आपल्या पक्षासोबत आणण्याची जबाबदारी अमित राज ठाकरेंकडे सोपवण्यात आली आहे. अमित ठाकरेंकडे राज ठाकरेंचा आधारस्तंभ म्हणून पाहिलं जातं. यापूर्वीही अमित ठाकरेंनी काही आंदोलनांचं नेतृत्व केलं होतं. जवळपास दीड महिन्यांपूर्वी अमित ठाकरेंनी नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या थाळीनाद मोर्चा काढला होता. याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.