लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांची वर्षाची कमाई दीड कोटीच्या घरात असल्याच्या चर्चेनंतर रातोरात ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून त्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील बड्या व्यक्तींना व सेलिब्रिटींना आवश्यकतेनुसार पोलीस सुरक्षा पुरवली जाते. अमिताभ बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. दोन हवालदार सतत त्यांच्यासोबत असतात. शिंदे हे त्यापैकी एक आहेत. शिंदे हे २०१५ पासून अमिताभ यांच्या सुरक्षेत होते.
त्यांची वार्षिक कमाई दीड कोटीच्या घरात असल्याच्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री त्यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. ते अमिताभ यांच्या जास्त विश्वासातले होते. त्यामुळे बदली होऊ नये म्हणूनदेखील बराच दबाव आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
शिंदे यांच्या पत्नीच्या नावावर खासगी सिक्युरीटी एजन्सी आहे. याअंतर्गत बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना तसेच नेतेमंडळींना सुरक्षा पुरविण्यात येत आहे. या एजन्सीद्वारे त्यांना पैसे येत होते का, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे कुठल्याही पोलीस हवालदाराला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी ड्युटी लावली जाऊ नये, अशा सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिल्या आहेत. त्यातून ही बदली झाल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.
....
...तर कारवाई होऊ शकते
नियमानुसार कुठलाही सरकारी कर्मचारी दोन ठिकाणांहून पगार घेऊ शकत नाही. शिंदे यांनी या नियमाचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. सुरुवातीला त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून याबाबत माहिती घेण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने नमूद केले.
......
पोलीस ठाण्यात हजर
बदलीच्या आदेशानंतर शिंदे हे शुक्रवारी डी.बी मार्ग पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.