Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन; शिवसैनिकांनी मातोश्रीवर रात्री १ वाजता कापला केक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 11:03 AM2022-07-27T11:03:36+5:302022-07-27T11:04:27+5:30
Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ६२ वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांसह सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर 'मातोश्री' निवासस्थानी येतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी 'मातोश्री'बाहेर रांगा लागतात. यातच आता शिवसैनिकांकडून रात्री १ वाजता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
यावेळी भलामोठा केक आणण्यात आला होता. यावेळी मातोश्रीवर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'तुम जियो हजारो साल... हॅपी बर्थडे साहेब', असा गाण्याच्या ओळी गात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. मातोश्रीवरील या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे दोघेही दिसत आहेत.
फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको
कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर मोठी सजावट करण्यात आली आहे. मातोश्रीचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर फुलांनी धनुष्यबाणाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळासह समाजातील सर्वच स्तरांतून उद्धव ठाकरे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.