बंडखोरीमुळे शिवसेनेच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 12:52 AM2019-10-15T00:52:25+5:302019-10-15T00:55:37+5:30
मतदारसंघातील चुरस वाढली : कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप
- खलील गिरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्याने, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार व मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासमोर बिकट परिस्थिती तयार झाली आहे. या मतदारसंघातील चुरस वाढू लागली आहे.
सावंत यांनी आपण विजयी होणार असल्याचा दावा केला आहे़ हा बाळासाहेब ठाकरेंचा मतदारसंघ असून, शिवसेना या ठिकाणी विजयी होईल, असा दावा शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब यांनी केला आहे.
सावंत यांच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. सावंत यांच्या प्रचारात सक्रिय असलेल्या ज्ञानेश्वरनगरमधील तरुणांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे, तर दुसरीकडे सावंत यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून आमिषे दाखविली जात आहेत, अशी माहिती कार्यकर्त्यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली. शिवसेनेच्या विधानसभेतील एकमेव महिला आमदार असलेल्या सावंत यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे़ त्याचा त्यांना लाभ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्याबद्दल मतदारसंघात सहानुभूतीचे वातावरण आहे़ त्याचा लाभ सावंत यांना होईल, असे सांगण्यात आले.
महाडेश्वर यांची संपूर्ण मदार शिवसेनेच्या संघटनेवर आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे मातोश्री निवासस्थान या मतदारसंघात असल्याने शिवसैनिकांसाठी कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ जिंकणे अत्यावश्यक आहे. महाडेश्वर यांच्या प्रचाराची सूत्रे आमदार अनिल परब यांनी त्यांच्या हातात घेतली आहेत. ते म्हणाले, बाळा सावंत यांच्याबाबत आम्हाला सहानुभूती आहे़ त्यासाठी बाळासाहेबांच्या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव होऊ शकत नाही़ बाळा सावंत हे शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते होते़ त्यांनी अशा प्रकारे बंडखोरी केली नसती.
स्वाभिमानची मदत?
२०१५ मध्ये या मतदारसंघात सावंत यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान संघटनेकडून या मतदारसंघात बंडखोर सावंत यांना मदत होत असल्याची चर्चा आहे. सावंत यांना मदत करून शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवाला हातभार लावण्याचा स्वाभिमानचा मनोदय आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील या मतदारसंघात पुरेसे लक्ष दिले नसल्याची चर्चा आहे.
विधानसभेसाठी इच्छुक असलेले महेश पारकर म्हणाले, आम्ही युतीचा धर्म पाळत आहोत़ शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय आहोत. त्यासोबत आम्ही विलेपार्ले मतदारसंघातील उमेदवार पराग अळवणी यांच्या प्रचारातदेखील सहभागी होत आहोत.