मुंबई : महानगरात दर महिन्याला सरासरी २५ ते ३० हजार गुन्हे घडतात. मात्र, त्यातील आर्थिक व सायबरचे वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान आगामी काळात असणार आहे, अशी कबुली मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी शनिवारी केले.गेल्या २, ३ वर्षांत मुंबईत महिला व पर्यटकांवरील हल्ल्याच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचे सांगतानाच, तपास कामामध्ये अत्याधुनिक शोध प्रणालीचा वापर करणारे मुंबई हे पहिले पोलीस दल आहे. त्यामुळे मुंबईकर सर्वार्थाने सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी मुंबई पोलीस दल आणि पोलिसांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. बर्वे यांनी वाढती गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. बदल्या जगातील आभासी कल्पना वास्तवात आणण्याचा प्रयत्न करताना, चुका होऊन अपराध घडतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिन्याला २५ ते ३० हजार गुन्हे घडत असताना, त्यापैकी बहुतांश आरोपी हे ओळखीचे असतात. त्यामुळे नागरिकांनी आपली सुरक्षा, परिसरातील घडामोडीची खबरदारी बाळगून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. सोशल मीडिया दुधारी शस्त्र असून, त्याच्या वापर कसा केला जातो, त्यावरच त्याचे परिणाम ठरतात. सायबर क्राइमला सीमारेषा राहिलेली नाही. त्यामुळे त्याच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढत आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी सायबर क्राइम पोलीस ठाणी कार्यरत केली आहेत, असे ते म्हणाले. देशविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी केंद्राने नव्याने बनविलेला ‘यूपीआय’ कायद्यामुळे दहशतवादी कारवायांना आळा बसणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट केले.पोलीस निवासाचा प्रस्ताव सादरमुंबईतील पोलिसांना हक्काचे निवासस्थान मिळावे, यासाठी आपण प्रयत्नशील असून, त्याबाबत प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. शासन त्याबाबत सकारात्मक असून लवकरच निर्णय घेईल, अशी आशा आयुक्त बर्वे यांनी व्यक्त केली.
'आगामी काळात सायबरचे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 2:54 AM