Join us  

विदर्भात वाहन निर्मिती उद्योग येण्यासाठी मोठ्या सवलतींची गरज: डॉ. विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 6:28 AM

उद्योग वाढीसाठीच्या प्रयत्नांबद्दल उद्योग मंत्र्यांना भेटून केले अभिनंदन.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विदर्भात वाहन निर्मिती उद्योग आणण्यासाठी या उद्योगांना मोठ्या सवलती देण्याची गरज असल्याची अपेक्षा माजी खासदार आणि लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केली आहे. विदर्भात चारचाकी, दुचाकी किंवा जड वाहन निर्मितीचा कारखाना आला तर त्याचा विदर्भ विकासासाठी फायदा होईल. वाहन उद्योग आल्यानंतर त्यावर आधारित विविध लहान युनिट त्या भागात उभी राहतात, असे त्यांनी सांगितले. डॉ. दर्डा यांनी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विदर्भातील उद्योगवाढीबरोबरच इतर विषयांवर सविस्तर चर्चा केली. 

राज्य सरकारने वाहन निर्मिती उद्योगांना सवलती दिल्या, तर हे उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्याऐवजी आपल्या राज्यात येतील, अशी सूचनाही त्यांनी केली. पुण्याच्या पलीकडे विदर्भात वाहन निर्मिती उद्योग जायला तयार नाहीत. यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. जवाहरलाल दर्डा उद्योगमंत्री असताना राज्याच्या सर्व भागाचा समतोल विकास व्हायला हवा त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचाच भाग म्हणजे बजाज कंपनीचा दुचाकी निर्मितीचा कारखाना मराठवाड्यात उभा राहिला. त्यानंतर राजेंद्र दर्डा उद्योगमंत्री असताना त्यांनीही वाहन निर्मिती प्रकल्प इतर भागात उभे राहण्यासाठी प्रयत्न केले. 

मराठवाड्यात बजाजनंतर स्कोडाचा वाहन निर्मिती कारखाना उभा राहिला. त्यातून आजूबाजूला वाहनांचे सुटे भाग तयार करणारे लहान-मोठे कारखाने उभे राहून मराठवाड्याच्या विकासाला बळ मिळाल्याचे डॉ. विजय दर्डा यांनी मंत्री सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. 

राज्य सरकारने नुकतीच विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ८१ हजार कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या उद्योगांची घोषणा केली आहे. त्याबाबत समाधान व्यक्त करत याबद्दल डॉ. दर्डा यांनी उद्योगमंत्री आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले. राज्यभर उद्योग वाढले तर तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असे सांगत राज्य सरकार उद्योग वाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल डॉ. दर्डा यांनी सामंत यांचे अभिनंदन केले. 

शैक्षणिक संस्था, रुग्णालयांना उद्योगांचे नियम नको

राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना उद्योगांचे नियम लावण्यात आलेले आहेत. शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या संस्थांना, तसेच रुग्णालयांना असे उद्योगाचे नियम लावू नयेत, अशी मागणी या भेटीदरम्यान उपस्थित असलेले ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी केली. यावर उद्योगमंत्री, तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. विपीन शर्मा यांनी सकारात्मकता दर्शवत उद्योग विभागाच्या बैठकीत हा विषय घेण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले आहे. 

विमानतळे ताब्यात घ्या

यवतमाळ, नांदेड, बारामती, धाराशिव व लातूर ही पाच विमानतळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या ताब्यात देण्यात आली आहेत. ही विमानतळे राज्य सरकारने तातडीने ताब्यात घेऊन विकसित करावीत, अशी विनंतीही डॉ. दर्डा यांनी सामंत यांना केली. यापूर्वीही त्यांनी वेळोवेळी सरकारकडे ही मागणी केली आहे. रिलायन्सने या विमानतळांचा विकास न केल्याने या विभागातील विकास कामे खोळंबल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.  

कोकणात पर्यटन विकास

कोकणात केवळ मासेमारी हा प्रमुख व्यवसाय न ठेवता पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा विकास करावा, पर्यटन हा पर्यावरणपूरक उद्योग आहे. मालदिवच्या धर्तीवर कोकणाचा विकास केला तर हजारो हातांना काम मिळेल, असेही डॉ. दर्डा या भेटीत म्हणाले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्रामसेनानी जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारतर्फे काढण्यात आलेला १०० रुपयांचा शिक्का आणि बाबूजींवरील ‘जवाहर’ या पुस्तकाची प्रत यावेळी डॉ. विजय दर्डा यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांना भेट दिले. 

महाराष्ट्राच्या विकासात एमआयडीसीचे मोलाचे योगदान लक्षात घेऊन एमआयडीसीच्या वर्धापनदिनानिमित्तही डॉ. दर्डा यांनी उद्योगमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

 

टॅग्स :विजय दर्डाउदय सामंत