स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानामागे मोठे षडयंत्र!- CM एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 05:49 AM2023-04-06T05:49:29+5:302023-04-06T05:50:04+5:30
‘मी सावरकर’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर शरसंधान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘‘महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांनी अनंत यातना दिल्या तरी ते डगमगले नाहीत. सावरकर आपले सरकार उलथवतील ही भीती ब्रिटिशांना होती. आजही सावरकरांचे विचार लोकप्रिय झाले तर आपला बाजार उठेल, अशी भीती अनेकांना वाटतेय. म्हणूनच त्यांच्या बदनामीचे षडयंत्र रचले जातेय. पण सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना मूॅंहतोड जवाब दिला जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून त्यांचे विचार जिल्ह्याजिल्ह्यात पोहोचविले जातील,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ‘मी सावरकर’ या कार्यक्रमात केले.
स्वा. सावरकरांचे धगधगते कवित्व उलगडून दाखविणारा ‘मी सावरकर’ हा संगीतमय कार्यक्रम बुधवारी दादर येथील सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेमागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा देशभक्तांचा अपमान आहे. ज्या दिवशी राहुल गांधी यांनी सावरकरांचा पुन्हा अपमान केला, तेव्हाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी सावरकर गौरव यात्रा काढण्याचे ठरविले. सावरकरांविषयी चुकीची माहिती पसरविली जात असताना त्यांचे विचार शहरात, जिल्ह्यात, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज होती. स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या त्यागाच्या एक टक्काही त्याग करण्याची राहुल गांधी यांची क्षमता नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या कर्तुत्वाची दखल घेतली. ‘भारतमातेचे ते सुपुत्र आहेत,’ असे त्या म्हणाल्या होत्या. पण आपल्या आजीचेही जे विचार घेऊ शकत नाहीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार,’’ असा टोला त्यांनी लगावला.
स्वार्थापोटी सुरू असलेले राजकारण भयंकर- आशीष शेलार
एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग आहे आणि दुसरीकडे सत्याच्या बाजूला राहणाऱ्यांना असत्याने मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण हे त्यांना बापजन्मात शक्य होणार नाही. राजकीय स्वार्थापोटी जे सुरू आहे ते महाभयंकर आहे, अशी टीका भाजप नेते आशीष शेलार यांनी विरोधकांवर केली.
... म्हणून सर्व सोडून निघालो
- ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचारानंतरही सावरकर डगमगले नाहीत. पण आज सत्तेसाठी लोक इकडून-तिकडे उड्या मारताहेत. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ, पण मागील सरकारच्या काळात जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभिनंदन प्रस्ताव आणायचे ठरविले आणि तो आणू शकलो नाही. राज्यात मुस्कटदाबी सुरू होती.
- हिंदुत्वाच्या बाजूने बोलणाऱ्यांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबले जात होते, याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण केले जात होते, तेव्हाच मी ठरवले आणि सर्व सोडून निघालो, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
- गायिका वैशाली सामंत, नंदेश उमप, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, भरत बलवल्ली यांनी संगीत कार्यक्रम सादर केला.