Join us

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 6:08 AM

लोकसभेसारखा फटका विधानसभेला बसू नये, याची काळजी भाजपकडून घेण्यात येत असल्याचे दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सहप्रभारी म्हणून रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाचवेळी दोन दिग्गज केंद्रीय मंत्र्यांवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक हाताळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोकसभेसारखा फटका विधानसभेला बसू नये, याची काळजी घेण्यात येत असल्याचे दिसते.

यादव यापूर्वी महाराष्ट्र भाजपचे केंद्रीय प्रभारी तर वैष्णव हे देखील महाराष्ट्र भाजपचे प्रभारी होते. २०२२ मध्ये विधान परिषद आणि राज्यसभेची निवडणूक झाली होती आणि राज्यात सत्तांतर घडले तेव्हा तेच प्रभारी होते. यादव आणि वैष्णव यांना विधानसभा निवडणुकीला साडेचार महिने शिल्लक असताना, पाठवून महाराष्ट्रात डॅमेज कंट्रोल हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट संकेत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिले आहेत. लोकसभेसारखा जागावाटपाचा घोळ होऊ नये, म्हणून यादव आणि वैष्णव यांना पुढाकार घेण्यास सांगण्यात येईल, असे मानले जाते.

महाराष्ट्राच्या पराभवाचा आज दिल्लीतील बैठकीत होणार पंचनामा

- महाराष्ट्रातील भाजपच्या निवडक नेत्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी दिल्लीत बोलविली आहे. कोअर कमिटीच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित राहतील.

- फडणवीस हे सोमवारी सायंकाळीच नागपुरातून दिल्लीला रवाना झाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत बैठकीत चर्चा होईल. प्रदेशाध्यक्ष पदावरून बावनकुळे यांना, तर मुंबई अध्यक्ष पदावरून आशिष शेलार यांना हटविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर काय ठरते, याची उत्सुकता आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीअमित शाहभाजपामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४