लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नायगाव येथील बी.डी.डी. चाळीला ‘शरद पवारनगर’ हे नाव देण्यात आले होते. मात्र, हे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बी.डी.डी. संकुल असे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत नायगाव येथील बी.डी.डी. चाळींना ‘शरद पवारनगर’ असे नाव देण्याची घोषणा केली. तसेच, वरळीतील चाळींना ‘बाळासाहेब ठाकरेनगर’ आणि डिलाइलरोड येथील चाळींना माजी पंतप्रधान राजीव गांधीनगर असे नाव देण्याचाही निर्णय त्यांनी घेतला होता. आव्हाड यांच्या या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. येथील लोकप्रतिनिधींनीही राज्य सरकारला पत्र लिहून हे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
शासन निर्णयात काय म्हटले आहे?
स्थानिक लोकप्रतिनिधींनी नायगाव परिसर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विभाग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी बी.डी.डी चाळ परिसरात मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे नाव देणे सामाजिकदृष्ट्या योग्य असेल, अशी विनंती केली आहे. त्याअनुषंगाने बी.डी.डी. चाळ, नायगाव याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बी.डी.डी. संकुल असे नामांतरण करण्यात येत आहे.