मुंबई : मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकराना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्वयंपुनर्विकास धोरणालाही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच, रखडलेले एसआरए प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसआरए प्रकल्पांत रखडलेल्या 10 लाख कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. याचबरोबर, एसआरए ट्रांझिट्स कॅम्पमधील घुसखोरांना दंड आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबई-ठाण्यातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला. मात्र हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे प्रलंबित होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना-भाजपा युतीच्या घोषणेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घरांना मालमत्ता करातून मुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला.