घटासाठी रंगीबेरंगी आकर्षक गरब्यांना मोठी मागणी
By Admin | Published: September 23, 2014 11:18 PM2014-09-23T23:18:52+5:302014-09-23T23:18:52+5:30
रंगीबेरंगी व आकर्षक सजावट केलेले मातीचे गरबे बाजारात दिसू लागले की, नवरात्रोत्सव जवळ आल्याची चाहूल लागते.
रवींद्र गायकवाड, कामोठे
रंगीबेरंगी व आकर्षक सजावट केलेले मातीचे गरबे बाजारात दिसू लागले की, नवरात्रोत्सव जवळ आल्याची चाहूल लागते. नवरात्रोत्सवात मराठी लोक घट पूजतात, तर गुजराती समाजात गरब्याची पूजा केली जाते. पूर्वी साध्या रुपात मिळणाऱ्या गरब्यांनाही आता मॉडर्न रुप आले आहेत. आकार तोच पण विविध सजावटींनी गरब्याचे रुपडे पूर्ण पालटल्याने गर्दीतही आकर्षक सजवलेले, खड्या मोत्यांनी नटलेले गरबे लक्ष वेधून घेत आहेत. गुजराती समाजातील महिलांबरोबर आता मराठी महिलाही घरात पूजनासाठीही या गरब्यालाच पसंती देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या बाजारात रंगीबेरंगी गरब्याचे आगमन झाल्याचे पहावयास मिळत आहे. दोन दिवसात नवरात्रोत्सव असल्याने विक्रेत्यांनी महिलांच्या दृष्टीस पडतील अशा आकर्षक गरब्यांची मांडणी दुकानात केली आहे. काही विक्रेत्यांनी गुजरातवरून मडकी मागवून त्यांच्यावर सजावट केली आहे, तर काहींनी रेडिमेड गरबे बनवून विक्रीला ठेवले आहेत. पूर्वी लाल व काळ्या मातीच्या रंगांचे, सुंदर नक्षीकाम केलेले, शोभिवंत खडे व मण्यांनी सजवलेले मातीचे आकर्षक गरबे बाजारात विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण सुंदर सजावट केलेल्या या गरब्याच्या मोहात पडत असल्याने गरब्यांच्या खरेदीकडे सर्वांचीच पावले वळत असून २५ टक्के लोकांनी नेण्यास सुरुवात केली आहे, असे रमेश वाघवाणी यांनी सांगितले.