शिवाजी पार्कात मोठा वळसा; गजबजलेल्या ठिकाणी सगळ्यांचीच काेंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 12:56 PM2023-10-09T12:56:19+5:302023-10-09T12:57:22+5:30
प्रभादेवी येथून परत मागे माहीम, वांद्रेकडे जाण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठा वळसा घालून स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांना जाण्याची वेळ आली आहे.
मुंबई : दादर पश्चिम येथे भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून येथील मुख्य रस्त्यावरील एक मार्गिका बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना भवन ते प्रभादेवीकडे जाताना वाहन कोंडी निर्माण होते. शिवाय प्रभादेवी येथून परत मागे माहीम, वांद्रेकडे जाण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठा वळसा घालून स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांना जाण्याची वेळ आली आहे.
गजबजलेल्या ठिकाणी सगळ्यांचीच काेंडी
- दादर परिसरात नेहमीच माणसांची आणि वाहनांची गर्दी असते. येथील शिवाजी पार्क आणि प्रभादेवी परिसर गजबजलेला असतो.
- अशा भागात शिवसेना भवन येथे भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. रस्त्यावरती पत्रे लावण्यात आले आहेत, त्यामुळे त्रास हाेत आहे.
- या कामासाठी प्रबोधन ठाकरे चौकातून डावीकडून पुढे रानडे रोडवरून माहीम, वांद्रे येथे जाताना वाटेत मुख्य रस्त्याची डावी बाजू गेली पाच सहा वर्ष बंद ठेवण्यात आली आहे.
- त्यामुळे चैत्यभूमी मार्गावरून सेनापती बापट पुतळा चौकाला मोठा वळसा घालून जावे लागते.