मुंबई :
माझ्यासारखे नवीन मराठी उद्योजक ज्यांना कोणतेही आर्थिक पाठबळ नाही, पण जे केवळ शिक्षण, कौशल्य, कला आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योग करण्यासाठी पाय रोवून उभे आहेत. अशा नवीन गुणवंत उद्योजकांना जर बड्या उद्योजकांनी मदत केली, म्हणजे अर्थातच आम्हाला एक ‘इन्व्हेस्टर’ म्हणून साथ दिली तर नक्कीच आम्ही आमच्या गुणवत्तेच्या जोरावर उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणू. तुमच्याकडे लक्ष्मी आहे तर आमच्याकडे सरस्वती आहे. आपण दोघे मिळून क्रांतीचे नवे पर्व उभे करू शकतो, असे मत विख्यात शेफ किरण साळवे यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, ‘‘तुम्हारे पास लक्ष्मी है, तो हमारे पास सरस्वती है। मिलके काम करेंगे।’’ त्यांचे हे वाक्य मला आज पुन्हा सांगावेसे वाटते. विशेषतः मोठ्या उद्योजकांना बाळासाहेबांच्याच शब्दात आवाहन करावेसे वाटते, असेही किरण साळवे म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कासरे गावचे मूळ रहिवासी असलेले साळवे फाइन आर्टचे कलाकार होते. नंतर ते शेफ बनले. त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधत आपली यशोगाथा उलगडली.
ते म्हणाले, ‘‘मी मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये उत्तम पगाराची नोकरी करत स्थिरावलो होतो. पण मला व्यवसाय करायचा होता. थोडक्यात सांगायचे तर नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा व्हायचे होते. आता व्यवसाय म्हटले की, अनेक अडचणी येणार. पण अशावेळी खचून न जाता आणि त्यावर मात करत आपले मनोधैर्य उंचावून काम करणे हे महत्त्वाचे आहे. आज जरी गोष्टी सुलभ वाटत असल्या, तरी त्या तितक्या कधीच नव्हत्या. एकदा व्यवसायात फसगत झाली. परिस्थितीच अशी आली की, खिशात केवळ १०० रुपयेच शिल्लक होते. ते देखील संपले.
आता काय करायचे, हा प्रश्न होता. लोकल स्थानकावर उभा होतो. माझ्या शेजारी एकजण पेपर वाचत होता. त्यात दोन लाखांचे कर्ज झाले म्हणून एका तरुणाने आत्महत्या केली, अशी बातमी होती. माझ्यावर तर त्यापेक्षा जास्त कर्ज होते. पण माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले नाहीत. याचाच अर्थ आपल्याजवळ काहीतरी वेगळे आहे, हे मला जाणवले आणि मी जिद्दीने पेटून उठलो. दुसऱ्याच दिवशी मला गुजरातमधून फोन आला. त्यांनी मेडिटेरियन पद्धतीचे किचन सेट करण्यासाठी बोलावले. पर्याय नसल्यामुळे मी ती ऑफर घेत त्यांच्याकडून सात दिवसांची मुदत मागून घेतली. सात दिवस त्या खाद्यसंस्कृतीचा काटेकोर अभ्यास केला आणि त्यांना ठरल्याप्रमाणे प्रेझेंटेशन दिले. ते काम मी मिळवले. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीदेखील जिद्द असेल तर मात करणे अवघड नाही,’’ असे साळवे म्हणाले.
अन्नपदार्थांची निर्मिती ही पण एक कलाचखरंतर माझा ओढा कला क्षेत्राकडे होता. पण मार्गदर्शनाअभावी मी या क्षेत्रात आलो. आवडीचे क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात आल्याबद्दल खरंतर मी सुरुवातीला फारसा खुश नव्हतो. पण जसजसे खाद्यपदार्थ बनवायला लागलो, तसे मला उमजू लागले की, अन्नपदार्थांची निर्मिती ही पण एक कलाच आहे आणि मला असलेली कलेची आवड मी या माध्यमातून साकारली पाहिजे. या दृष्टिकोनातून मी समृद्ध होत गेलो. माझ्या कलात्मक दृष्टीकोनामुळेच अनेक पदार्थांचे फ्यूजन करणे, फ्रूट कार्विंग, प्लेट सजविणे अशा गोष्टींकडे मी बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली. - किरण साळवे, विख्यात शेफ