कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मोठ्या सदनिका

By admin | Published: January 25, 2016 02:38 AM2016-01-25T02:38:24+5:302016-01-25T02:38:24+5:30

वरळीत पोलिसांसाठी बांधलेल्या नव्या निवासस्थानामुळे (क्वाटर्स) वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. वरळीतील जुन्या वसाहतींमधील २२० ते ३२० चौरस फुटांच्या जागेत फौजदार,

A big house for junior employees | कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मोठ्या सदनिका

कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मोठ्या सदनिका

Next

जमीर काझी , मुंबई
वरळीत पोलिसांसाठी बांधलेल्या नव्या निवासस्थानामुळे (क्वाटर्स) वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. वरळीतील जुन्या वसाहतींमधील २२० ते ३२० चौरस फुटांच्या जागेत फौजदार, निरीक्षक राहत असताना जवळपास त्याच्याहून दुप्पट जागेचे फ्लॅट कॉन्स्टेबल व अंमलदारांना वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना पोलीस आयुक्त अहमद जावेद, सहआयुक्त (प्रशासन) अरुपकुमार सिंग यांनी भेटण्यास नकार दिला आहे. मुख्यालय (२)च्या उपायुक्त सुनीता ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. हा प्रकार समजल्यानंतर कर्मचाऱ्यांनी परिसरात फटाके वाजवून आनंद साजरा केला. या सगळ्या प्रकारामुळे या दोन घटकांतील विसंवाद वाढण्याची शक्यता आहे.
वरळीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाच्या मागे असलेल्या जागेत पोलीस गृहनिर्माण विभागाने ६० कोटी रुपये खर्च करून ५ बहुमजली इमारती बांधल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येकी ४७३ चौरस फुटांचे १०८ फ्लॅट आहेत. कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवासस्थान म्हणून बांधण्यात आलेल्या इमारतीच्या खोल्यांचे क्षेत्रफळ कॉन्स्टेबलसाठी मंजूर जागेपेक्षा मोठ्या असल्याने सुरुवातीला त्यांना देण्यास तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी नकार दिला होता. त्यांच्याऐवजी कमी क्षेत्रफळाच्या सदनिकेत राहत असलेल्या उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना त्या वितरित करण्याचे नियोजन होते. मात्र दरम्यानच्या काळात वरळीत पोलीस कर्मचारी राहत असलेल्या ८ इमारती महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केल्याने त्या ठिकाणी राहत असलेल्या १०८ कर्मचाऱ्यांना नव्याने बांधलेल्या पारिजात, सूरजमुखी या इमारतींमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय आयुक्त अहमद जावेद यांनी घेतला. त्यानुसार शुक्रवारी त्यांचे वितरण करण्यात आले.
मात्र या इमारतींच्या परिसरातच २२०, ३२० चौरस फूट जागेत वर्षानुवर्षे राहत असलेले पीएसआय, एपीआय व पीआय मंडळी नाराज झाली. त्यांच्या विरोधाला वरिष्ठ जुमानत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांपैकी काहींनी फटाके उडवून आनंद साजरा केला. या प्रकारामुळे गेल्या चार दिवसांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नव्याने वितरित केलेल्या १०८ सदनिकांपैकी ५० सदनिका कॉन्स्टेबल तर उर्वरित सदनिका हवालदार, एएसआयना मिळाल्या आहेत. त्यापैकी काही कॉन्स्टेबल २०११ला भरती झालेले आहेत. एकीकडे एपीआय, पीआय त्याचप्रमाणे निवृत्तीला आलेले हवालदार २३०, ३१० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिकांमध्ये राहत असताना ४ वर्षांपूर्वी भरती झालेल्यांना तब्बल ४७३ चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका मिळाल्या आहेत.
या विसंगतीमुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. सदनिकांसाठी इच्छुक अधिकाऱ्यांना २७ जानेवारी रोजी आझाद मैदानातील प्रेरणा हॉल येथे पाचारण करण्यात येणार आहे. किमान त्या वेळी तरी त्यांना योग्य वागणूक दिली जाते का? हे पाहावे लागणार आहे.

Web Title: A big house for junior employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.