मुंबई - देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus Patients) मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. दरम्यान मुंबई कोरोना विषाणूच्या त्सुनामीचाही सामना करण्यास तयार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मात्र, सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यात, मुंबईतील जेजे रुग्णालयातील 61 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबई कोरोना वाढीचं केंद्रस्थान ठरत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १० हजार ८६० नवे रुग्ण आढळले आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी देखील आता ११० दिवसांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर ०.६३ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णवाढ पाहता पालिका प्रशासन आणि राज्य सरकारसमोरील चिंता वाढली आहे. त्यामुळे मुंबईत आता कडक निर्बंध लादले जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यातच, येथील जे.जे रुग्णालयातील 61 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या डॉक्टरांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं दिली आहे.
"... तर लॉकडाऊनवर विचार"
"गरज भासल्यास अजून कठोर पावलं उचलली जातील. जर मुंबईत दररोज २० हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या दिसून आली तर यावर विचार केला जाईल. लोक मार्गदर्शक सूचनांचं पालन करत नाहीत. आजही अनेक जण मास्क घालत नाही. जे नागरिक आहेत, त्यांना आपली जबाबदारी समजून घ्यावी लागेल. मुंबईत ९ वीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. आमचे मेडिकल सेंटर्स, हॉस्पीटल्स तयार आहेत," असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आठवड्याभरापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (WHO) टेड्रोस घेब्रेयसिस यांनी ओमायक्रॉनमुळे (Omicron) रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असा इशारा दिला होता. "ओमायक्रॉन हा अधिक प्रसार होणारा विषाणू आहे आणि डेल्टा प्रमाणे या विषाणूमुळेही रुग्णसंख्येची त्सुनामी येईल," असंही ते म्हणाले होते.