Join us

मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 12:23 AM

ज्या मोबाईल फोनवरून ही धमकी देण्यात आली होती तो मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. 

Mumbai Police ( Marathi News ) : मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोनद्वारे धमकी देणाऱ्या सदर आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. तसंच ज्या मोबाईल फोनवरून ही धमकी देण्यात आली होती तो मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. २७) मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करुन प्रसिद्ध ताज हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले होते. या कॉलमुळे पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. या कॉलला गांभीर्याने घेत पोलिसांच्या पथकाने ताज हॉटेल आणि विमानतळाची झाडाझडती घेतली, पण कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

हा कॉल उत्तर प्रदेशातून आल्याचं स्पष्ट झालं होतं. कॉल करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. पण, तपासादरम्यान त्या ठिकाणी काहीही सापडले नाही. त्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. अखेर पाचव्या दिवशी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

दरम्यान, ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचा नक्की काय हेतू होता, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या आधीही आला होता कॉल मुंबई पोलिसांना धमकीचा फोन येण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेकदा कॉलवर कधी गेटवे ऑफ इंडिया तर कधी विमानतळ उडवण्याच्या धमक्या येत असतात. एवढेच नाही तर कधी कधी एखाद्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देणारे फोनही मुंबई पोलिसांकडे येतात. याआधीही अज्ञात कॉलरने मुंबई पोलिसांना अलर्ट करत ३५० किलो आरडीएक्स पाकिस्तानहून मुंबईत आले असून ते विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसह इतर ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. पण, तेव्हाही तपासात काही सापडले नाही. 

टॅग्स :मुंबई पोलीसगुन्हेगारीताजमहालमुंबई बॉम्बस्फोट