मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. दोन दिवसापूर्वी या मंत्र्यांना खात्यांचे वाटपही करण्यात आले आहे. उद्यापासून विधीमंडळीचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील नेते खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांचा एक गट तर शरद पवार यांचा एक गट, असे राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. दरम्यान, आता या फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार गटातील नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करुन वाय बी चव्हाण सेंटरकडे बोलावले असल्याचे पाटील यांनी सांगितले. आज विरोधी पक्षांची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील स्वत: अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे हे नेते वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या भेटीवर बोलताना म्हणाले, मला या भेटी संदर्भात माहिती नाही. मला खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आला त्यांनी मला वाय बी चव्हाण सेंटरला बोलावलं आहे.