मोठी बातमी! रायगडच्या धैर्यशील पाटील यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 06:44 PM2024-08-20T18:44:43+5:302024-08-20T18:45:02+5:30
भाजपाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच भाजपाने रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मोहरा गळाला लावला होता. आता दुसऱ्याच वर्षी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपाने राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आसामधून मिशनरंजन दास, रामेश्वर तेली. बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिसा येथून ममता मेहंता, राजस्थान मधून सरदार रवनीत सिंह बिट्टू, त्रिपुरा येथून राजीब भट्टाचार्जी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
BJP releases a list of candidates for the upcoming by-elections to the Rajya Sabha from different states.
— ANI (@ANI) August 20, 2024
Bar Council of India Chairman, senior advocate Manan Kumar Mishra from Bihar
George Kurian from Madhya Pradesh
Ravneet Singh Bittu from Rajasthan
Rajib Bhattacharjee from… pic.twitter.com/eanMZsB2nh
राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक झाल्यानंतर या दोन जागांवर कोण लढणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. भाजपाचे नेते पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर भाजपा आपले उमेदवार देणार की त्यापैकी एक जागा मित्रपक्षाला देणार, याबाबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता भाजपाने यादी जाहीर करत एकाच जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. राज्यसभेसाठी भाजपाकडून अनेकांची नावांची चर्चा होती. पण, रायगडच्या धैर्यशील पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
१२ जागांसाठी निवडणुका होणार
दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांमध्ये रिक्त असलेल्या राज्यसभेच्या १२ जागांसाठी येत्या ३ सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. तसेच त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. यात महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांचा समावेश आहे. सातारच्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेची जागा आम्हाला मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार भाजप आता राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार असल्याचं बोललं जात आहे. आज भाजपाने एकच जागा जाहीर केल्याने आता दुसरी जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला राज्यसभेची उमेदवारी देणार या चर्चा सुरू आहेत.