मोठी बातमी: भाजपची आता वेगळी रणनीती; विधानसभेसाठीचा नवा फॉर्म्युला आला समोर

By यदू जोशी | Published: August 25, 2024 06:14 AM2024-08-25T06:14:27+5:302024-08-25T06:15:06+5:30

राज्यातील मोठ्या नेत्यांना आतापासूनच निवडणुकीच्या तयारीसाठी उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Big news BJPs new strategy now for maharashtra assembly elections | मोठी बातमी: भाजपची आता वेगळी रणनीती; विधानसभेसाठीचा नवा फॉर्म्युला आला समोर

मोठी बातमी: भाजपची आता वेगळी रणनीती; विधानसभेसाठीचा नवा फॉर्म्युला आला समोर

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क| 
मुंबई : आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला थोडा खो देत विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने नवीन रणनीती आखली आहे. टूलकिट हा त्यातील कळीचा शब्द आहे. या शिवाय देशाच्या विविध भागातील नेत्यांना प्रवासी नेते  म्हणून महाराष्ट्रात उतरविले  जाणार आहे. 

विधानसभा मतदारसंघ असा फोकस न करता पंचायत समिती सर्कल फोकस करून प्रचारयंत्रणा, संपर्कयंत्रणा राबविली जाणार आहे. पक्षातील असे नेते जे गटबाजी करतात अशांबाबतचा अहवाल पक्षाकडे गेला आहे. त्यांना महत्त्व दिले जाणार नाही. निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्यांना लोकसभा निवडणुकीत डावलले गेले अशा तक्रारी होत्या, आता या अनुभवी व्यक्तींना अधिक जबाबदारी देण्याचे ठरले आहे. नेत्यांपेक्षा कार्यकर्ता हा बेस राहील, असेही सूत्रांनी सांगितले. 

विविध राज्यांमधील नेत्यांना उतरवणार
विविध राज्यांमधील नेत्यांना निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचारकार्यात शेवटच्या वीसेएक दिवसात उतरविले जात असे. दिवस कमी असल्याने पक्षाची स्थानिक यंत्रणा आणि हे बाहेरून आलेले नेते यांच्यात समन्वय स्थापित होणे कठीण जायचे. या उलट बरेचदा वादही होत असत. हे लक्षात आल्यानंतर अन्य राज्यातील मोठ्या नेत्यांना आतापासूनच निवडणुकीच्या तयारीसाठी उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

भाजपच्या बैठकांवर बैठक सुरु
दोन दिवसांपूर्वी नागपुरात एक बैठक झाली. केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मध्य प्रदेशचे प्रभावी नेते कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, विश्वास नारंग, खा. फग्गनसिंह कुलस्ते तसेच तेथील पक्षाचे संघटन मंत्री हितानंद शर्मा, तेलंगणाचे संघटन मंत्री चंद्रशेखर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीममधील ऋत्विक मेहता आणि विदर्भातील आठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सोमवारी एक महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. प्रत्येक विभागात अन्य राज्यांतील नेते  (प्रवासी नेते) उतरविले जातील.

असा असेल फॉर्म्युला 
१५-३००-१५०- ४५००
- आतापर्यंत निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने बूथप्रमुख हा महत्त्वाचा घटक असायचा. बूथप्रमुखांची रचना कायम ठेवली जाणार असली तरी त्याला समांतर एक वेगळी रचना आता करण्यात आली आहे. 
- राजकीय समज एकदम पक्की असलेल्या १५ जणांची एक टीम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार केली जात आहे. 
- त्यात निवडणुका जिंकण्याचा, लढण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार प्रमुख कार्यकर्ते, नेते असतील. हे टूलकिट क्रमांक एक असेल. या १५ जणांपैकी प्रत्येक जण ३०० जणांची टीम तयार करेल, हे टूलकिट क्रमांक २ असेल. 
- हे ३०० जण मग प्रत्येकी १५० या प्रमाणे ४५ हजार जणांच्या टीम तयार करतील. हे सगळे जण एका ॲपवर जोडले जातील आणि ते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतील. 
- बूथप्रमुख पक्षासाठी कष्ट खूप करतो; पण लोकांना प्रभावित करणे, त्यांना पक्षाकडे खेचून आणण्याबाबत तो कमी पडतो हे लक्षात आल्यानंतर आता ही वेगळी रचना करण्याचे ठरले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी १५०० महिलांच्या उपस्थितीत १५ मेळावे घेण्यात येणार आहेत. 

Web Title: Big news BJPs new strategy now for maharashtra assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.