Join us

मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 11:20 PM

धमकीचे ईमेल VPN नेटवर्क वापरून पाठवले गेले आहेत. पाठवणाऱ्याची ओळख आणि धमकीचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. 

देशभरातील विविध ठिकाणच्या ३९ विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील हॉस्पिटल आणि कॉलेजना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आला आहे. यामुळे मुंबई पोलिसांत खळबळ उडाली असून सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि अनेक हॉस्पिटल्ससह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटल्सना बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. धमकीचे ईमेल VPN नेटवर्क वापरून पाठवले गेले आहेत. पाठवणाऱ्याची ओळख आणि धमकीचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. 

यानंतर काही वेळाने मुंबईतील हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. मुंबईचे व्हीपी रोड पीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवून देण्यात आले होते. यावेळीही डार्कनेटचा वापर केला गेला होता. एकाचवेळी अनेक मेल आयडींवर हे धमक्यांचे मेल केले गेले होते.  

टॅग्स :स्फोटकेमुंबई पोलीसहॉस्पिटल