मोठी बातमी... 75 % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शासन आदेश निघाला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 09:59 PM2021-10-26T21:59:15+5:302021-10-26T22:03:37+5:30
महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे
मुंबई - राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने 26 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित केला आहे. दरम्यान, यापूर्वी सरकारने 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे
ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 या काळात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. शेतकऱ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती देत महाविकास आघाडी सरकारने शब्द पाळल्याचं म्हटलंय.
ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७५ टक्के मदतनिधीप्रमाणे मंजूर २८६० कोटींपैकी ५०२.३७ कोटी रूपये (मराठवाड्यात सर्वाधिक) निर्गमित झाले आहेत. मदतीचा पहिला टप्पा म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ५०२.३७ कोटी रूपये मिळतील. (2/3)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 26, 2021
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचा शब्द महाविकासआघाडी सरकारने पाळला. राज्यातील शेती पिकांच्या नुकसानापोटी देय असलेल्या मदत निधीपैकी ७५% रक्कम २ हजार ८६० कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश निर्गमित झाला आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७५ टक्के मदतनिधीप्रमाणे मंजूर २८६० कोटींपैकी ५०२.३७ कोटी रूपये (मराठवाड्यात सर्वाधिक) निर्गमित झाले आहेत. मदतीचा पहिला टप्पा म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ५०२.३७ कोटी रूपये मिळतील, असे धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे.