मोठी बातमी! ड्रग्समाफिया ललित पाटीलला अटक; अचानक आलेल्या एका कॉलनं संपूर्ण डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 08:10 AM2023-10-18T08:10:17+5:302023-10-18T08:31:33+5:30

मुंबई पोलिसांनी ललितला चेन्नईतून अटक केली असल्याची बातमी आहे. या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

Big news! Drug mafia Lalit Patil arrested by Mumbai Police in Chennai | मोठी बातमी! ड्रग्समाफिया ललित पाटीलला अटक; अचानक आलेल्या एका कॉलनं संपूर्ण डाव फसला

मोठी बातमी! ड्रग्समाफिया ललित पाटीलला अटक; अचानक आलेल्या एका कॉलनं संपूर्ण डाव फसला

मुंबई – ड्रग्स प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ललित पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नईतून ललितला अटक केल्याचं समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील पसार झाला होता. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला गेल्याचं सांगण्यात आले. पुणे पोलिसांची शोध पथके ललितच्या मागावर होती. पुणे पोलिसांसह मुंबई पोलिसही ललितच्या शोधात होती. मुंबई पोलिसांनीच ललित पाटीलचा नाशिकमधला ड्रग्स कारखाना उद्ध्वस्त केला होता.

मुंबई पोलिसांनी ललितला चेन्नईतून अटक केली असल्याची बातमी आहे. या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. कारण हे प्रकरण संवेदनशील आहे. ललित पाटील याला पळण्यात राजकीय नेत्याचा हात होता असा आरोप करण्यात आला. राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादानेच ललित पाटीलला ससूनच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे म्हटलं जात होते. आता ललित पाटीलला साकिनाका पोलिसांच्या पथकाने चेन्नईत अटक केली आहे. याच पोलिसांनी नाशिकमध्ये २००-३०० कोटींचे ड्रग्स जप्त केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ललित पाटील हा पुण्याहून गुजरातला गेला होता. त्याठिकाणाहून त्याने टूर्स आणि ट्रॅव्हल्स गाडी भाड्याने घेतली. त्या वाहनाने तो कर्नाटकात गेला. त्यानंतर तो चेन्नईला पोहचला. नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी कारवाई केली तेव्हा ललित पाटीलच्या एका निकटवर्तीयाला अटक करण्यात आली होती. परंतु याची कुठलीही खबर माध्यमांना लागून दिली नाही. पोलिसांच्या अटकेत असलेल्या या आरोपीलाच ललित पाटीलचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यक्तीला ललित पाटीलशी बोलायला सांगितले. त्यानंतर ललितने कशारितीने तो फरार झाला, कुठून कसा गेला हे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पाठलाग करून ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली.

ससून ड्रग रँकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ आणि मेफेड्राँन बनविणारा भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी १० ऑक्टोबरला नेपाळ बाँर्डरवर पकडले. ललित पाटील याचा शोध पोलीस घेत होती. त्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. ललित पाटील पोलिसांच्या नजरकैदेतून पसार झाला, त्यामुळे पोलिसांची सर्वत्र नाचक्की झाली होती, याप्रकरणी न्यायाधीशांनी पोलिसांना फटकारले होते. या पार्श्वभूमीवर एखादे सलून काढायचे म्हटले तरी पोलिसांना कळते. पण ललित पाटील पसार झालेला पोलिसांना कळत नाही अशी टिप्पणीही न्यायाधीशांनी केली होती.

Web Title: Big news! Drug mafia Lalit Patil arrested by Mumbai Police in Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.