कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीने एसबीआयच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट मुंबई महापालिकेवरच छापा टाकला आहे. बुधवारी ठाकरे गटाच्या सचिवासह पालिकेचे अधिकारी आणि इतरांवर ईडीने छापा टाकला होता. सुमारे १५ ठिकाणी ही छापेमारी झाली होती. या छाप्यांत आढळलेल्या कागपत्रांची शहानिशा करण्यासाठी ईडी पालिकेत पोहोचली आहे.
ईडीने आपला मोर्चा महापालिकेच्या खरेदी खाते विभागाकडे वळविला आहे. महत्वाचे म्हणजे ईडीसोबत स्टेट बँकेचे अधिकारी देखील आहेत. कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी कारवाई आहे. कोविड सेंटरसाठी लागणारी सामग्री खरेदीमध्ये काही गैरव्यवहार झालेत का याची चौकशी केली जात आहे. या खात्याकडूनच सर्व साहित्य कोविड सेंटरना दिले जात होते.
कामाला मंजुरीच्या पत्रावर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची स्वाक्षरी असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी वर्क ऑर्डरचे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे.
ईडीने बुधवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील १० ते १५ ठिकाणांवर छापे टाकले. त्यात मुंबई महापालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय व शिवसेना सचिव सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्या घर आणि कार्यालयांची तपासणी करण्यात आली.
प्रकरण काय?
कोरोनाकाळात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून कोविड सेंटर उभारणी आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.