MLC Election ( Marathi News ) : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. मात्र आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संवादाचा अभाव झाल्याचं मान्य केलं आणि त्यानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर जैन यांनी अर्ज मागे घेतला आहे. तसंच या मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या दोन्ही उमेदवारांकडून काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
एकीकडे, महाविकास आघाडीतील उमेदवारीचा तिढा सुटत असताना महायुतीलाही बंडखोरांना शांत करण्यात यश आलं आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय मोरे यांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर असा थेट सामना रंगणार आहे.
काँग्रेसच्याही दोन उमेदवारांची माघार
काँग्रेस हायकमांड आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसच्याही दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे यांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं. तसंच नाशिक पदवीधरमधील काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनीही माघार घेतली आहे.
पदवीधरसाठी २२, शिक्षक मतदारसंघासाठी २० अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २२ अर्ज दाखल झाले होते. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये १० अर्ज दाखल झाले होते, त्यात उद्धवसेना, शिंदेसेना, भाजपच्या उमेदवारांचा समावेश होता. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी २० अर्ज दाखल झाले होते. यात उद्धवसेना, समाजवादी रिपब्लिकन पार्टी, अजित पवार गट, काँग्रेस, शिंदेसेनेच्या उमेदवारांचा समावेश होते.
उद्धव ठाकरेंनी काय भूमिका मांडली?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानपरिषद निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली. "महाविकास आघाडीत बिघाडी नाही. संवादात थोडं लूज कनेक्शन होतं, कारण मी लोकसभा निवडणूक झाल्यावर सात आठ दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळात विधानपरिषद निवडणुकीच्या तारखा जवळ आल्या होत्या. त्यामुळे सर्व पक्षाने विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले होते. दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून माझ्याशी आणि संजय राऊतांशीही फोनवरून संवाद झाला. त्यामुळे नाशिक, कोकण याबाबत आम्ही समझोता करतोय. निवडणूक झाल्या झाल्या मी इथं नव्हतो. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचे सुरू होते. अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला म्हणून आम्ही अर्ज भरले होते," असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.