Join us

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे परीक्षांबाबत मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 8:31 AM

मुंबई विद्यापीठाकडूनही परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Rains ( Marathi News ) : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील २४ तासांत मुसळधार पाऊस बरसला आहे. परिणाम अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून काल रात्रीही हवामान खात्याने मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने सोमवारनंतर आज मंगळवारीही सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाकडूनही परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

"मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे आज मंगळवारी मुंबई विद्यापीठात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. तसंच परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच कळवल्या जातील," अशी माहिती मुंबई विद्यापीठाने दिली आहे. 

राज्यात पावसाचा धुमाकूळ

गुजरातपासून केरळपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार होते; तेव्हा अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढतो. हे वारे किनारपटटीच्या भागात बाष्पयुक्त वारे घेऊन येतात. परिणामी किनारपट्टीच्या भागात पावसाचा वेग जास्त दिसून येतो. सध्या गुजरातपासून केरळच्या किनारपटटीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे संपुर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. सह्याद्रीच्या घाट भागावरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळेही येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्‍यांकडून प्रशासनाला निर्देश

राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांनी सोमवारी सायंकाळी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :मुंबई विद्यापीठमुंबई मान्सून अपडेटमुंबईहवामान