यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क |
Maharashtra Vidhan Parishad ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असताना राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त १२ जागांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रिक्त असलेल्या १२ जागांपैकी सात जागांसाठी महायुती सरकारने नावे निश्चित केली असून यामध्ये भाजपकडून तीन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोन जागांसाठीच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.
भाजपकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याचे ठरवल्याची माहिती आहे.
राज्यपाल नियुक्त जागांचा गुंता
महाराष्ट्र विधानपरिषेदतील राज्यपाल नियुक्त १२ जागांचा तिढा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी या जागांची नियुक्ती व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात होते. या १२ जागांमध्ये भाजपला सहा, शिंदेंच्या शिवसेनेला तीन, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तीन जागा, असा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची चर्चा होती. या १२ पैकी आता महायुती सरकारने सात जागांच्या नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे.