मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 08:55 AM2024-09-24T08:55:59+5:302024-09-24T08:57:12+5:30
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या बैठकीनंतर दिली आहे.
Maratha Reservation ( Marathi News ) : मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काल मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सगेसोयरे अधिसूचनेसह हैदराबाद गॅझेटबाबत महत्त्वाची चर्चा झाली आहे. "मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सगेसोयरे बाबत काढावयाच्या अंतिम अधिसूचनेचे प्रारूप तयार करण्याविषयी तसेच हैदराबाद, मुंबई व सातारा गॅझेटबाबत निवृत्त न्या. गायकवाड व न्या. शिंदे यांचा समावेश असलेल्या सल्लागार मंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत सह्याद्री अतिथीगृह इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं," अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या बैठकीनंतर दिली आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदस्य, मराठा आरक्षण उपासमिती, निवृत्त न्या. गायकवाड, न्या. शिंदे, सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
बैठकीतील चर्चेविषयी माहिती देताना शंभूराज देसाई म्हणाले की, "सगेसोयरे अधिसूचनेबाबत प्रारूप ठरवण्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात आहे. याविषयी सूचना, आक्षेप निकाली काढण्यात येत आहेत. याबाबत अंतिम अधिसूचनेचे प्रारूप कसे असावे हे ठरवण्यासाठी दिनांक ३० सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी प्रारूपावरील सूचना निकाली काढण्यात येतील. सगेसोयरे अधिसूचनेबाबत भविष्यात कुठलीही कायदेविषयक अडचण निर्माण होऊ नये म्हणून, कायदेशीर मत घेऊन प्रारूप तयार करण्यात येईल. हैदराबाद, सातारा व मुंबई गॅझेटबाबत झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत करण्यात येईल व त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल," असं मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.