MHADA Lottery 2024 मोठी बातमी: म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी १३ सप्टेंबरला निघणार!
By सचिन लुंगसे | Published: August 7, 2024 06:12 PM2024-08-07T18:12:47+5:302024-08-07T18:23:34+5:30
MHADA Lottery 2024 ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : MHADA Lottery 2024 गोरेगाव, अँटॉप हिल - वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर - विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २ हजार ३० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून सुरुवात होणार आहे. तर १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता लॉटरी काढण्यात येणार असून ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल.
घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक दुपारी १२ पासून उपलब्ध राहील. नोंदणीकृत अर्जदारही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत आहे. ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती ४ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत केली जाईल. अर्जाची प्रारूप यादी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ पर्यंत प्रसिद्ध होईल. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत मुदत आहे. लॉटरीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ पर्यंत प्रसिद्ध होईल.
दरम्यान, म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या गटासाठी किती घरे
उत्पन्न गट / घरे
अत्यल्प उत्पन्न / ३५९
अल्प उत्पन्न / ६२७
मध्यम उत्पन्न / ७६८
उच्च उत्पन्न / २७६
म्हाडाने बांधलेली १३२७ घरे, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून बिल्डरांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त ३७० घरे व मागील लॉटरीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ घरांचा समावेश आहे.
१) लॉटरीत सहभागी होण्याकरिता म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टीम मोबाइल अॅप उपलब्ध आहे.
२) https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध आहे.
३) अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल संकेतस्थळावर आहे.
कोणत्या गटासाठी किती वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा
अत्यल्प उत्पन्न गट / सहा लाख
अल्प उत्पन्न गट / नऊ लाख
मध्यम उत्पन्न गट / बारा लाख
उच्च उत्पन्न गट / बारा लाखांहून अधिक, या गटासाठी कमाल मर्यादा नाही.
कोण कुठे अर्ज करू शकते ?
१) अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
२) अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
३) मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
४) उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.