Join us

मोठी बातमी... मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही; पुढील सुनावणी 10 डिसेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 3:36 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा न्यायालयीन लढाईस सुरुवात झाली आहे.

मुंबई - मराठा आरक्षणला तूर्तास स्थगिती देण्यात येणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात दाखल केलेली याचिका अद्याप निकाली निघाली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण सध्यातरी अबाधित आहे. तसेच 10 डिसेंबरपर्यंत या याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. तर, 10 डिसेंबरला या याचिकेसह मराठा आरक्षणासंदर्भातील इतरही याचिका निकालात काढण्यात येतील. विशेष म्हणजे, मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा न्यायालयीन लढाईस सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, दुपारी 3 वाजता न्यायालयाने यावर सुनावणी पूर्ण केली. त्यानुसार मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. 

राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर याविरोधात न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, मराठा आरक्षणाचा विषय आज न्यायालयात आल्यावर आरक्षणाला विरोध करणाऱ्या जयश्री पाटील यांचे ऑन रेकॉर्ड वकील गुणरत्न सदावर्ते हे अनुपस्थित होते. याचिका दाखल करण्यासाठी ऑन रेकॉर्ड वकील उपस्थित असणे आवश्यक असते, या तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर न्यायमूर्तींनी  याविषयी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. मात्र संबंधित पक्षकारांना याचिका सादर करण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. 

मराठा आरक्षणाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरकारने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली असून आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.  

टॅग्स :मराठा आरक्षणउच्च न्यायालयन्यायालयमराठामराठा क्रांती मोर्चा