मुंबई - राज्य शासनाने कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा खबरदारीसाठी कडक उपाययोजना आखण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.
राज्य शासनाने परिपत्र काढून नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 17 मार्च रोजी यासंदर्भात परीपत्रक काढलं आहे. त्यामध्ये, कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
तोंडावर मास्क असल्याशिवाय कुठल्याही आस्थापनामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. कार्यालयाच्या प्रवेशद्वारा तापमान तपासण्यात येईल, तसेच प्रत्येक कार्यालयात सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आलं आहे. शासनाने काढलेला हा आदेश 31 मार्च पर्यंत अंमलात येणार असून त्यानंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही या आदेशात म्हटले आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या सहीने हा आदेश पारित करण्यात आला आहे.
राज्यात दिवसभरात 25 हजार रुग्णांची वाढ
मुंबईत गुरुवारी २ हजार ८७७ नवे रुग्ण आढळून आले असून, ८ जणांचा मृत्यू झाला. तर राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. राज्यात गुरुवारी २५,८३३ नवीन रुग्ण सापडले. मुंबईतही दिवसभरात अडीच हजारांहून अधिक रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक २४,८९६ रुग्ण एक दिवसात सापडले होते. त्यामुळे राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे.