Join us  

मोठी बातमी: मुंबईत पावसाचा धुमाकूळ; पोलिसांकडून मुंबईकरांना अलर्ट, केलं महत्त्वाचं आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 1:55 PM

पावसामुळे वाहतूकही विस्कळीत झाली असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

Mumbai Rain Update ( Marathi News ) :मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून आज सकाळपासूनही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, दादर, वरळी या भागांत दमदार पावसाने हजेरी लावली असून सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनीही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

"मुंबईमध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व पावसाचा जोर पाहता नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे आणि  गरज असेल तरच घराबाहेर पडावं," असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसंच खबरदारी घ्या व आपत्कालीन परिस्थितीत #१०० डायल करा, असंही मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून अंधेरी पंप हाऊस परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. तसंच या पावसामुळे वाहतूकही विस्कळीत झाली असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून पश्चिम उपनगरांत पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे.

राज्यात पुढील दोन दिवस कशी असणार पावसाची स्थिती?

२२ जुलैया दिवशी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात पाच जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

२३ जुलैया दिवशी केवळ रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून  कोकणातील इतर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा वगळता कोणत्याच जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही.तर विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसहवामानमुंबई