मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा; पक्षनेतृत्वाला केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 02:48 PM2024-06-05T14:48:11+5:302024-06-05T14:49:16+5:30

भाजपच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

Big News Relieve me from Deputy Chief Ministership devenda Fadnavis demand to the party leadership | मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा; पक्षनेतृत्वाला केली विनंती

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा; पक्षनेतृत्वाला केली विनंती

Devendra Fadnavis ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाल्यानंतर राज्यात भाजपला मोठा धक्का बसला. मागील लोकसभा निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा मात्र अवघ्या नऊ मतदारसंघांमध्ये विजय मिळवता आला. या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. "विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करावं, अशी मागणी मी पक्षनेतृत्वाकडे करणार आहे," अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

"महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फार अंतर नाही. मतांची टक्केवारीही जवळपास सारखीच आहे. मात्र महाविकास आघाडीच्या मतांचं एकत्रिकरण झाल्यामुळे त्यांच्या जास्त जागा आल्या. मात्र असं असलं तरी राज्यात आमच्या जागा कमी आल्या, याची जबाबदारी मी स्वत: घेत आहे," असंही फडणवीस म्हणाले.

राज्याच्या निकालात नेमकं काय घडलं?

 पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हाेमपीच तसेच गेल्या दाेन निवडणुकीत भाजपने मिळविलेला एक हाती विजय अशी पृष्ठभूमी असतानाही विदर्भात भाजपला आपला गड शाबूत ठेवता आला नाही. काॅंग्रेसने जाेरदार मुसंडी मारत रामटेक, गडचिराेली, चंद्रपूर, अमरावती, भंडारा गाेंदिया या पाच तर उद्धवसेनेने यवतमाळ अन् शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने वर्धा मतदारसंघात विजय मिळवला. नागपुरातून नितिन गडकरी, अकोल्यातून अनुप धाेत्रे हे भाजपचे उमेदवार निवडून आले. बुलढाण्यात शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत. 

शेतकरी आत्महत्या, कापूस, सोयाबीन, धान या सारख्या शेतमालाचे पडलेले भाव, महागाई, बेरोजगारीबाबत असलेला असंतोष व संविधान धोक्यात या भावनांना काॅंग्रेसने हात घातला. तो मतदारांना भावल्याचे निकालावरुन स्पष्ट दिसत आहे.  नागपुरात भाजपचे हेवीवेट नेते नितिन गडकरी यांना मताधिक्य मिळविण्यासाठी काॅंग्रेसच्या विकास ठाकरे यांनी चांगलेच झुंजविले, रामटेकमध्ये काॅंग्रेसचे आमदार राजु पारवे यांना शिंदेसेनेत प्रवेश देत उमेदवारी देण्याची भाजपने खेळी केली. दुसरीकडे  काॅंग्रेसच्या घाेषीत उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र अवैध झाल्याने ऐनवेळी काॅंग्रसने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी द्यावी लागली. अशा गाेंधळातही माेदींची सभा, मुख्यमंत्री  शिंदे यांनी मतदारसंघात ठाेकलेला तळही मतदारांना प्रभावित करू शकला नाही, हेच काॅंग्रेसला मिळालेल्या यशावरून दिसत आहे.  

Web Title: Big News Relieve me from Deputy Chief Ministership devenda Fadnavis demand to the party leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.