मोठी बातमी : शाळांची घंटा वाजणार, या तारखेपासून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार
By बाळकृष्ण परब | Published: January 15, 2021 07:21 PM2021-01-15T19:21:06+5:302021-01-15T19:40:45+5:30
School News : नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील
मुंबई - कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. आधी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. दरम्यान, शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दरम्यान, शाळा सुरू करण्यासंदर्भातील अधिकार हे स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यापासून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर लॉकडाऊनच्या नियमांमुळे शाळा बंद होत्या. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर काही काळापूर्वी नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.