Join us

मोठी बातमी: अबू आझमींच्या हाती लवकरच घड्याळ? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 9:20 PM

अबू आझमी हे थेट भाजपमध्ये प्रवेश करू शकत नसल्याने त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निवडल्याची माहिती आहे.

Abu Azmi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुंबईत मोठी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती आहे. आझमी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंबंधी चर्चा करण्यासाठी रविवारी रात्री उशिरा त्यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत मुंबईत बैठक झाल्याचे समजते. पुढील तीन ते चार दिवसांत हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अबू आझमी हे गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्षात नाराज आहेत. त्यातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठी भाजपचा एक नेता प्रयत्नशील असल्याचंही बोललं जात आहे. मात्र आझमी हे थेट भाजपमध्ये प्रवेश करू शकत नसल्याने त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निवडण्याचे निश्चित केलं आहे. या अनुषंगाने त्यांची प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत भेट झाली असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो.

दरम्यान, अबू आझमी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने मुंबईत महायुतीची ताकद वाढणार असून महायुतीच्या उमेदवाराला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात फायदा होण्याची शक्यता आहे.

मुश्ताक अंतुले यांचाही राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अंतुले यांचं राष्ट्रवादीत स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादीत प्रवेश करताना मुश्ताक अंतुले यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्रात अजितदादांच्या रुपानं विकास करण्याची एक शक्ती उभी राहिली आहे आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला."

टॅग्स :अबू आझमीराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारलोकसभा निवडणूक २०२४