मुंबई - राज्य सरकारने 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच 112 तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले. तर राज्यातील 39 तालुके मध्यम दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने तोंड फिरवल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती बनली होती. त्यामुळे विरोधकांकडूनही सातत्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील पालकमंत्र्यांना दुष्काळी दौरा करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, पालकमंत्र्यांनी दुष्काळी दौरा करुन त्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर, 180 तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, राज्य सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या, त्यावेळी दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य तालुक्यांबाबतही माहिती दिली होती. त्यानंतर, आज राज्य सरकारकडून राज्यातील 151 तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला आहे.