मनोहर कुंभेजकर
मुंबई-दि.४ जून रोजी पार पडलेल्या पार पडलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या दिवशी चुरशीच्या लढाईत उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर हे ४८ मतानी पराजित झाले होते. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे सीसीटिव्ही फूटेज देण्याची विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदरचा अर्ज जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्याकडे पुढील निर्णयासाठी दिला होता.
उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून काल गुरुवार दि, १३ जून रोजी दुपारी कीर्तीकर यांचे निवडणूक प्रतिनिधी राजेश शेट्ये यांना फोन आला. सीसीटीव्ही चा फूटेच कार्यालयात प्राप्त झालेला आहे.आपण योग्य ती हार्डडिक्स घेऊन ते कॉपी करायला कोणाला तरी पाठवावे असे सांगितले, त्यानुसार त्यानंतर कीर्तिकरांचे सहकारी नितेश राणे हे कार्यालयात गेले असता त्यांना सदरचे फूटेज देण्यास टाळाटाळ केली. अखेर आज प्रत्यक्ष उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची वांद्रे पूर्व कार्यालयात भेट झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाचे नियमाचे संदर्भ देऊन सदरचे फूटेज देण्याची असमर्थता दर्शवली.
भारत निवडणूक आयोगाच्या दि,१८/०७/२०२३ मधील सूचना व निवडणूक नियम, १९६१ मधील नियम ९३ (१ ) मधील तरतूदी बघता आपण मागणी केलेले २७ मुंबई उत्तर पश्चिमच्या ४/०६/२४ रोजीच्या मतमोजणीच्या संदर्भातील सीसीटीव्ही फूटेज/ व्हिडिओ कव्हरेज आपल्याला देणे शक्य होत नाही असे उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी अमोल कीर्तिकर यांना लेखी कळवले आहे.
याबाबत अमोल कीर्तिकर यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की,हा निकाल उद्धव सेनेला अजिबात मान्य नाही.येथील निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची भूमिका संशयास्पदच असून या निकाला विरोधात आम्ही लवकरच न्यायालयात जाणार आहें.माझे एजंट मतांची मोजणी करत होते आणि दुपारी ३.३० च्या सुमारास मी ६५१ मतांनी आघाडीवर असल्याने मी निवडणूक जिंकत होतो. अचानक त्यांनी सुमारे दोन तास मोजणी थांबवली. दुपारी साडेतीनच्या सुमारास मतमोजणीच्या २६ फेऱ्या पूर्ण झाल्या, मात्र निकाल जाहीर झाला नाही. संध्याकाळी ७.५३ च्या सुमारास त्यांनी घोषित केले की मी हरलो हे कसे काय शक्य आहे? मी या मतमोजणीवर तीव्र आक्षेप घेतला असून त्यात फेरफार झाल्याचा संशय आहे.राजकीय दबावामुळे उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी निवडणूक आयोगाचे नियमाचे संदर्भ देऊन सदरचे फूटेज देण्याची असमर्थता दर्शवली असा आरोप त्यांनी केला.यामुळे आता आपल्या मनात विविध शंका कुशंका यांना वाव मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.