मोठी बातमी : सुनील शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 08:00 PM2023-12-12T20:00:49+5:302023-12-12T20:06:53+5:30
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढल्यानंतर सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे.
मुंबई : आधी दोन सदस्यांनी आणि नुकताच अध्यक्षांनीही राज्य मागासवर्ग आयोगाच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारने आता अखेर या आयोगाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. सुनील शिक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच सदस्यपदाच्या रिक्त जागांवर ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढल्यानंतर सरकार दरबारी हालचालींना वेग आला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या समाजाचं मागासलेपण सिद्ध होणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सर्वेक्षण करण्याची विनंती राज्य सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र आमच्या कामकाजात सरकारमधील काही घटक हस्तक्षेप करत असल्याचं सांगत आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता. तसंच काही दिवसांपूर्वी आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता अखेर राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा ४ डिसेंबर रोजी दिला आणि ९ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो स्वीकारला होता.