Join us

मोठी बातमी: काँग्रेसचे दोन आमदार रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटले, लवकरच पक्षप्रवेश?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 1:41 PM

Congress MLA: कारवाईची टांगती तलवार असलेल्या विद्यमान आमदारांनी नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.

CM Eknath Shinde ( Marathi News ) : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप असणाऱ्या काँग्रेस आमदारांवर पक्षाकडून कारवाईची टांगती तलवार असतानाच यातील दोन आमदारांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे. हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर अशी मुख्यमंत्र्‍यांची भेट घेणाऱ्या काँग्रेस आमदारांची नावे आहेत. या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत चर्चा केल्याने आगामी काळात ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके, झिशान सिद्दिकी आणि मोहन हंबर्डे यांनी विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करत महायुतीच्या उमेदवारांना मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या पाचही आमदारांना काँग्रेस पक्ष तिकीट देणार नसल्याचे समजते. याबाबतच्या सूचना काँग्रेस हायकमांडने काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांना दिल्या होत्या. क्रॉस वोटिंगच्या आरोपामुळे ज्या आमदारांचं तिकीट कापलं जाणार आहे त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसकडून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे कारवाईची टांगती तलवार असलेल्या विद्यमान आमदारांनी नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या आमदारांनी काय स्पष्टीकरण दिलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली असली तरी या दोन्ही आमदारांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. "मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून मी काँग्रेससोबत होतो आणि आगामी काळातही काँग्रेससोबतच राहणार आहे. मला पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे," असा दावा हिरामण खोसकर यांनी केला आहे. तर दुसरीकडे, जितेश अंतापूरकर यांनीही पक्षांतराच्या चर्चा फेटाळल्या आहेत. मी ई-पिक पाहणी अहवालाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून राजकीय चर्चा केली नसल्याचं अंतापूरकर यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाविधान परिषदमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४